स्टार प्रवाहवर २४ तारखेपासून सुरु होतेय नवी मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’. आताच्या घडीला बरेच जण विभक्त कुटुंबाकडे वळत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व ही मालिका पटवून देईल. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या मालिकेतल्या भूमिकेविषयी अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत तुम्ही साकारत असलेली वहिनी नेमकी कशी आहे?

या मालिकेत मी सरिता ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दीरांना मुलांप्रमाणे जपणारी आणि संपूर्ण कुटुंब प्रेमाने बांधून ठेवणारी अशी ही वहिनी आहे. सहकुटुंब सहपरिवार नावाप्रमाणेच ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. मालिकेचा विषय खूप छान आहे. त्यामुळे मालिकाविश्वात कमबॅक करायचा विचार मनात आला तेव्हा यापेक्षा चांगला रोल असूच शकत नाही हे मी मनाशी पक्क ठरवलं आणि तातडीने होकार दिला. साताऱ्यातल्या भुईंज गावातलं हे एक कुटुंब आहे. दादा, वहिनी आई आणि तीन भावंड असं हे हसतं खेळतं कुटुंब आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी त्याचा मिळून सामना करणारं असं हे कुटुंब. नंतर कुटुंब जसं वाढत जातं, नवी माणसं जशी कुटुंबात यायला लागतात त्यानंतर नेमकं काय घडतं याची गोष्ट तुम्हाला मालिकेत पाहायला मिळेल.

 

सुनील बर्वेंसोबत तुम्ही पहिल्यांदाच काम करत आहात. त्याविषयी काय सांगाल?

मी सुनील दादाची खूप मोठी चाहती आहे आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची संधी मिळते आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सुनील दादा कमाल आहे. समोरच्या कलाकाराला तो खूप कम्फर्टेबल करतो. त्यामुळेच आमचे सीन खूप छान होतात. मला वाटतं सहकलाकारासोबत उत्तम केमिस्ट्री असली की ते सीन्स खूप खरे वाटतात. सुनील दादाची ही खासियत आहे जी मला खूप भावते.


सिनेमा आणि टीव्ही यामध्ये नेमका काय फरक जाणवतो?

दोन्ही माध्यम खूप वेगळी आहेत त्यामुळे फरक नक्कीच आहे. सिनेमा प्रमाणेच टेलिव्हिजन हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. दिवसभर कामात बिझी असणाऱ्या गृहिणींचं विश्व संध्याकाळ झाली की बदलतं. टीव्हीचा रिमोट हातात आला की टेलिव्हिजन हेच त्यांच विश्व होऊन जातं. मला वाटतं टेलिव्हिजनमुळे तुम्ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचता. प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. त्यामुळे सिनेमा आणि टीव्ही ही दोन्ही माध्यमं मला तितकीच आव्हानात्मक वाटतात.


 मालिकेतल्या तुमच्या लूकविषयी काय सांगाल?

सरिता वहिनीचा साधेपणा तिच्या लूकमधुनही दिसून येतो. सर्वसामान्य गृहिणी प्रमाणेच रोजच्या वापरातल्या साड्या, वेणी आणि कपाळावरचं हळदी-कुंकू हेच सरिताच्या लूकचं वेगळेपण आहे. सरिता तुम्हाला तुमच्या घरातलीच वहिनी आणि सून नक्कीच वाटेल. २४ तारखेपासून सायंकाळी ७ वाजता आम्ही तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार दररोज भेटायला येणार आहोत. तेव्हा न चुकता आमची मालिका पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा.