सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा मराठी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘बोनस’ या चित्रपटाचे ‘माइक दे’ हे रॅप गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

माईक दे हे गाणे सोशल मीडिया वर बरच गाजत आहे आणि ह्या गाण्याचं संपूर्ण शूटिंग के कोळीवाड्यात झाले आहे,त्याच गाण्याच्या शूटिंग दरम्यान गश्मीर आणि पूजा ने बाईक राईड करत आहेत असा व्हिडिओ ह्या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया साईट वर शेअर केला आहे.


‘बोनस या चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा आहे ती या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे. गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकिट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुकही झाले.

 पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.


चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे यांनी केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.