स्टार प्रवाहवर २५ नोव्हेंबरपासून भेटीला येणाऱ्या ‘अग्निहोत्र २’ मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करु आहे. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकं कोणतं कथासूत्र असणार आणि कोणती पात्र असणार याबद्दल कुतुहल आहे. ‘अग्निहोत्र २’ मध्ये सप्तमातृकांचं रहस्य उलगडणार असून महादेव अग्निहोत्रींच्या भूमिकेत पुन्हा एकदा शरद पोंक्षे भेटीला येणार आहेत. तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होतेय. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पीढीची नवी गोष्ट उलगडेल.

‘अग्निहोत्र २’ विषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणे हे अविश्वसनीय आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पहिले असल्याने तो दर्जा टिकवणे हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल.’


‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेविषयी सांगताना कथाकार श्रीरंग गोडबोले म्हणाले,  ‘कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येतं आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. आजवर केलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र ही मालिका खूपच खास आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे.’

 
अग्निहोत्र २चा नवा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. २५ नोव्हेंबरपासून ‘अग्निहोत्र २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.